पुण्याहवाचन.

कार्यक्रम

April 30, 2021


१. उद्देश ‘पुण्य + अह + वाचन = पुण्याहवाचन. ‘कार्यारंभाचा दिवस पुण्य म्हणजे शुभकारक आहे’, असे ब्राह्मणांकडून वदविणे, असा या शब्दाचा अर्थ आहे. कोणत्याही मंगलकार्याला पंचांगात शुभ दिवस पाहूनच प्रारंभ करतात; पण तरीही ब्राह्मणांनी तो दिवस पुण्यकारक असल्याचे सांगून आणि यजमानाला तसा आशीर्वाद देऊन त्या कामी दुजोरा द्यायचा असतो, तसेच कल्याण व्हावे, समृद्धी व्हावी, लक्ष्मीची परिपूर्णता व्हावी, यांसाठी ब्राह्मणांना विनंती केल्यावर ब्राह्मण ‘तसे होईल’ असा आशीर्वाद देतात.’ २. महत्त्व ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारामुळे त्या दिवसाला शक्ती प्राप्त होते. ३. साहित्य अ. नेहमीचे पूजेचे आ. पंचपल्लव : आंबा, उंबर (औदुंबर), पिंपळ, जांभूळ आणि वड यांच्या डहाळ्या. इ. पंचामृत : दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे मिश्रण. ई. पंचरत्न : सुवर्ण, माणिक, नीलमणी, पद्मराग (पाचू) आणि मोती ४. सिद्धता यजमानाच्या उजव्या हाताला स्त्रीने आणि तिच्या उजव्या हाताला संस्कार्य व्यक्तीने बसावे. या विधीच्या वेळी जास्त शक्ती निर्माण व्हावी; म्हणून स्त्री यजमानाच्या उजव्या हाताला असते. उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. ५. संकल्प देशकालोच्चार केल्यावर संस्कारविधीचा संकल्प करतात आणि ‘त्याच्या अंगभूत श्री गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध करतो’, असे म्हणून ताम्हणात पाणी सोडतात. ६. भूमीस्पर्श मंत्र म्हणून प्रथम उजव्या अंगाच्या (यजमानाचे तोंड पूर्वेकडे असल्याने दक्षिण दिशेकडील) आणि नंतर डाव्या अंगाच्या (म्हणजे उत्तर दिशेकडील) आपल्या समोरच्या भूमीस स्पर्श करावा. दक्षिण दिशेकडील शक्ती त्रासदायक आहेत. त्यांनी त्रास देऊ नये; म्हणून भूमीस्पर्श करून त्यांना वंदन करतात. उत्तरेकडील शक्ती कल्याणकारक आहेत; म्हणून त्यांना वंदन करतात. ७. कलशस्थापना मंत्र म्हणून भूमीवर तांदळाच्या दोन लहानशा राशी कराव्या. नंतर मंत्र म्हणून सोन्याचे, रुप्याचे, तांब्याचे अथवा चांगल्या मातीचे न फुटलेले असे दोन कलश तांदळाच्या त्या दोन राशींवर ठेवावे. ७ तीर्थोदक दोन्ही कलशांत गंगादी नद्यांचे किंवा इतर स्वच्छ पाणी भरावे. त्यात गंध आणि दूर्वा घालाव्या. त्यानंतर कलशात पंचपल्लव घालावे. त्यानंतर कलशात सुपारी, पंचरत्ने आणि दक्षिणा घालावी. शेवटी कलशाला सूत्रवेष्टन करावे किंवा वस्त्र घालावे. ७. पूर्णपात्रे दोन पात्रांत तांदूळ भरून त्यांवर एकेक सुपारी ठेवून ती दोन्ही पूर्णपात्रे कलशांच्या तोंडावर झाकणे म्हणून ठेवावीत. दोन पात्रांतील एक वरुणाच्या उजव्या दिशेचे आणि दुसरे डाव्या दिशेचे सूचक आहे. उजव्या दिशेच्या कलशाचे ठायी वरुणाचे आवाहन करावे. ‘कलशे वरुणं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि ।’ असे म्हणून सुपारीवर अक्षता वहाव्या. मग वरुणाची पंचोपचारपूजा करावी. कलशप्रार्थना ‘कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः । मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ।’ इत्यादी. मग उत्तर दिशेच्या कलशात अक्षता घालाव्या. सर्वांना नमस्कार करून (मातृदेवो भव । पितृदेवो भव ।…….. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः । म्हणून) दोन्ही गुडघे भूमीस लावून बसावे. नंतर कमलासमान हात करून उत्तर कलश हाती घेऊन स्वतःच्या आणि पत्नीच्या कपाळास तीनदा स्पर्शवावा. कलशात आलेली शक्ती ग्रहण करण्यासाठी हा कलशाला केलेला नमस्कार होय. यजमानाने `शांतिरस्तु’ इत्यादी वाक्ये म्हणत आपल्यासमोर ठेवलेल्या ताम्हणात पाणी सोडावे. मग पुरोहिताने ‘पुण्यदिवस असो, कल्याण होईल, समृद्धी होईल, लक्ष्मीची परिपूर्णता होईल’, असे म्हणावे. निरांजनमंत्र म्हणून यजमान, यजमानीण आणि संस्कार्य, अशा तिघांनाही इतर पुरंध्रींनी (सुवासिनींनी) निरांजन ओवाळावे. नंतर उजव्या हाताने डावीकडचा आणि डाव्या हाताने उजवीकडचा कलश उचलून त्यांतील पाण्याच्या दोन धारा वेगवेगळ्या एका पात्रात पडू द्याव्या. दोन्ही कलशांतील पाणी एकत्र करणे, म्हणजे उजवी आणि डावी नाडी यांपेक्षा सुषुम्नानाडी चालू करणे. नंतर स्त्रीने यजमानाच्या डाव्या अंगास बसावे आणि पुरोहितांनी उत्तराभिमुख उभे राहून पंचपल्लव आणि दूर्वा यांनी पात्रातील उदकाने यजमान, स्त्री आणि संस्कार्य, या सर्वांना मंत्र म्हणत अभिषेक करावा. यामुळे कलशात आलेली शक्ती सर्वांना मिळते. यानंतर स्त्रीने यजमानाच्या उजव्या अंगास बसावे. शेवटी यजमानाने दोन वेळा आचमन करावे, म्हणजे विधी संपला.

कीर्तनगुरू वेबसाइट वर आजच आपले नाव नोंदवा.

नाव नोंदवा